+91-7208479918
info@asmitatrust.org

अस्मिता संचालित,छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर

बालवाडी किंवा शिशुवर्गात मुले वयाच्या ४ थ्या वर्षी दाखल होतात. २ ते ३ वर्षे मुले/मुली बालवाडी/शिशुवर्गात (प्लेग्रूप मध्ये ) घालवतात. बालवाडी मध्ये मुलं बोलणे, वागणे, वावरणे व विविध समन्वय शिकतात. विविध शैक्षणिक खेळ जसे रंग ओळखणे, आकार ओळखणे, चित्र काढणे/रंगवणे इत्यादी क्रिया बालवाडी मध्ये शिकवल्या जातात. बालवाडीत स्व अनुभव,¸ मानसिक विकास¸ शारीरिक विकास,¸ आत्मिक विकास,¸ सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. यातूनच “घर हेच विद्यालय ” ही मूळ संकल्पना बालवाडीत राबविली जाते. संस्कृती व संस्कारांचे शिंपण शिशु मनावर केले जाते. यासाठी संस्थेचे मोलाचे सहकार्य सातत्याने मिळत असते.

शिशुवयात (तीन ते सहा वर्षे ) मेंदू घडत असतो, त्याची अत्यंत झपाट्यानं वाढ होत असते. शिकण्याची कौशल्यं विकसित करणं, हे “बालशिक्षणा’त अभिप्रेत असतं. मुलाना बालवाडीत घालण्याच खर  उद्दिष्ट “बालशिक्षण’ हेच असतं, बालशिक्षण म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षण असतं, या शिक्षणातून मुलांच्या ज्ञानेंद्रियांचा वापर होईल, अशा निरनिराळ्या कृतींची, अनुभवांची संधी देणं, स्वतः धडपडत, गोंधळत, प्रश्‍नांची उत्तर शोधण्यासाठी त्यांना उद्युक्त (प्रोत्साहित) करणं, हे सारं  अपेक्षित असत.

विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, स्नायूंचा विकास, स्वावलंबन, बौद्धिक विकास, आत्मविश्वास, क्रियाशीलता वाढविणाऱ्या अनेक उपक्रमांनी ही शाळा आपल्या शाळेतील चिमुकल्यांचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी झटते आहे.

सांपत्तिक स्थिती बेताची असूनही  मुलांना उत्तम व चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याची जिद्द असलेले पालक हे शाळेचे वैशिष्टय़. म्हणूनच वैयक्तिक स्वच्छतेपासून संस्कृती-सणांच्या महतीपर्यंत, अभ्यासापासून खेळापर्यंत असे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी जे जे पूरक ठरेल ते ते ही शाळा देण्याचा प्रयत्न करते. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत छान तयारीने केले जाते. फुले-फळे, फुगे, खेळणी यांनी वर्ग सजवून मुलांचे शाळेविषयीचे आकर्षण वाढविले जाते. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांचे प्रेमाने स्वागत केले जाते.

जूनमध्ये सर्व पालकांची पालकसभा घेऊन वर्षाचे कार्यक्रम, उपक्रम, नियम, सूचना व अभ्यासक्रम यांची माहिती दिली जाते. अंक व अक्षरे गिरवण्यासाठी वहय़ा असतात. छोटय़ा गटाला बौद्धिक मेवा व चित्रकलेची पुस्तके असतात. हस्तव्यवसाय, चिकटकाम,  ठसेकाम, कोलाजकाम, शिवणकाम वगैरे शिकविले जाते.

जुलैमध्ये गुरुपौर्णिमेचे आयोजन केले जाते. त्यानंतर दीपपूजन करून दिवा दाखवून मुलांना त्याचा परिचय करून दिला जातो. मातीचा नाग व वारूळ दाखवून नागपंचमीची माहिती दिली जाते. दातांचे आरोग्य, सकस आहार, बालकांचे आरोग्य या विषयातील तज्ज्ञ बोलावून पालकांना माहिती दिली जाते.  मुलांनी राखी तयार करणे, हंडी तयार करणे, दहीहंडीचा कार्यक्रम शाळेत साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समूहगीत, देशभक्तिपरगीत, कवायत, नृत्य असे कार्यक्रम सादर केले जातात. लहानपणापासूनच मुलांमध्ये सर्वधर्मसमभाव रुजावा यासाठी सर्व सण उत्सव साजरे केले जातात.

या शिवाय मुलांच्या सर्वागीण विकासासाठी पुढील उपक्रम राबविले जातात –

 • गप्पागोष्टी  यामुळे मुलांचा भाषाविकास होतो. विचाराची देवाणघेवाण करायला मुले शिकतात.  पूर्ण वाक्यात बातमी अथवा निरोप सांगायला शिकतात.
 • परिचय पाठ  बुद्धीला चालना मिळावी यासाठी निरनिराळ्या वस्तूंचा परिचय करून दिला जातो.
 • भाषा  शब्दसंग्रह वाढविणे, वाक्यरचना सुधारणे.
 • व्याकरण खेळ लिंग-वचनाचा बदल, शब्दांचा योग्य वापर हे शिकायला मिळते.
 • इंद्रिय शिक्षण  मूळ रंग, आवाज ओळखणे, वास ओळखणे, स्पर्शज्ञान,यात विकसित केले जाते.
 • प्रयोग  तरंगणे, बुडणे, पेरणे, निरनिराळ्या चवी देणे, हवेच्या गमती-जमती, जलचक्र, विरघळणे-न विरघळणे, हे प्रयोग दाखविले जातात. यामुळे मुलांची निरीक्षणशक्ती   वाढते, स्नायूंचा विकास होतो, स्नायूंवर नियंत्रण येते. बुद्धीला चालना मिळते.
 • जीवनव्यवहार  भाजी निवडणे, धान्य निवडणे, पाखडणे, चिरणे, कापणे, सोलणे, कुटणे, वाटणे, दळणे, ताक घुसळणे, बाटलीत पाणी भरणे. अशा कृतींमधून हात, डोळे, मेंदू या अवयवांचा समन्वय साधला जातो आणि मुलांना स्वालंबन, स्वानुभवाची सवय होते. स्नायूंचा विकास होतो. मुले अनुकरणशील होतात.
 • हस्तव्यवसाय  मातीकाम, ठसेकाम, चित्र रंगविणे, घडीकाम. यामुळे बौद्धिक, सौंदर्यदृष्टीचा विकास होतो. कल्पनाशक्तीला, कौशल्याला वाव मिळतो.
 • खेळ  शाळेत मैदानी खेळ, बैठे खेळ घेतले जातात. यामुळे व्यायाम होतो, आत्मविश्वास, धीटपणा, भूक, निर्णयक्षमता वाढते. मनोरंजन, सामाजिक, व्यक्तिमत्त्व विकास होतो. तसेच मुलांना इतरांच्यात मिळून मिसळून वागण्याची सवय होते.
 • मुक्त व्यवसाय  मुक्तपणे खेळणे. यावर कुणाचेही बंधन नसते.
 • रचनात्मक खेळ यामुळे क्रियाशीलतेला वाव आणि विचारांना चालना मिळते. बौद्धिक विकास होतो व स्नांयूवर ताबा येतो.

या शिवाय इंग्रजी संभाषणाचे वर्ग (तास) घेतले जातात. शाळेत प्रोजेक्टर व टीव्ही वर अंक, अक्षरे, गाणी, गोष्टी आदी दाखविले जाते. 

वर्षभरात साजरे होणाऱ्या सणांच्या अनुषंगानं मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवनिमित्त मातीचा गणपती बनवणे, गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता कार्यक्रम, नवरात्रोत्सवानिमित्त भोंडल्याचा, दसरा निमित्त पाटीपूजनाचा कार्यक्रम केला जातो.  दिवाळीनिमित्त ग्रिटींग कार्ड व आकाश कंदिल बनवला जातो. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण केले जाते, फळ्यावर त्याचे नाव लिहिले जाते.    

या व्यतिरिक्त भातुकलीचा खेळ, स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव, सहल, आरोग्य तपासणी, असे कार्यक्रम आयोजिले जातात. मुलांच्या शालेय आयुष्याची पायाभरणी सर्व बाजूंनी पक्की करण्यासाठी शाळेत राबविले जाणारे आणखीही अनेक उपक्रम आहेत.