अस्मिता संचालित “मनोहर हरिराम चौगले अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र” अशोकवन बोरिवली (पूर्व) येथे अमृतपुत्र आणि अमृतकन्या यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत म्हणून अनेक उपक्रम राबविले जातात. समाजातील विविध मान्यवर व्यक्ती नेहमीच या केंद्राला भेट देत असतात व आपापल्या परीने मदत करीत असतात. दिनांक १७.२.२०२४ रोजी अशीच एक सुंदर संध्याकाळ अनुभवायला मिळाली .
स्वरमेघा या संगीताची आवड जोपासणाऱ्या संस्थेतर्फे मराठी हिंदी गाण्याची सुरेल मैफिल सादर करण्यात आली. अतिशय संवेदनशील असणाऱ्या संगीत शिक्षिका सौ. योगिता बोराटे या संगीताचा प्रसार करता करता सामाजिक बांधिलकी देखील जपतात याची जाणीव झाली.
नृत्य शिक्षिका मेघना मॅडम यांनी नृत्य करताना मन ताजेतवाने आणि तरुण असेल तर वय आणि शारीरिक मर्यादा नृत्याच्या आड येत नाहीत, हेच सिद्ध केले. सर्व अमृतपुत्र आणि कन्यांचे अतिशय सुंदर नृत्य बघावयास मिळाले. अगदी सफाई सेवाव्रतीपासून डॉक्टरांपर्यंत सर्वांनी नृत्य कौशल्य दाखवण्यासाठी फेर धरला होता. ‘फॅशन शो’ तर चकित करून टाकणार होता. अमृत पुत्र आणि कन्यांची जिद्द आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
सामाजिक कळकळ असणाऱ्या आणि समाजातील दुर्लक्षित घटकांमध्ये काम करण्यास उत्साहाने सहभागी होणाऱ्या सौ.मधु वस्त्रदे यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता. सौ मधु मॅडम या अनेक पुरस्कार प्राप्त कन्नड भाषिक कवयित्री आहेत. प्रत्येक कलाकाराची ओळख करून देताना त्या संस्थेतील सदस्यांशी आस्थेने संवाद साधत होत्या. उपस्थितांना प्रेमाची भेटवस्तू आणि अल्पोपहाराची व्यवस्था देखील सौ.मधु मॅडम यांनी केली होती. अशा खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व व्यक्तींबद्दल संस्था नेहमीच ऋणी राहील. विश्वस्त श्री.रमेश म्हात्रे आणि सेवाव्रती सौ.मिनाताई यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रमाची धुरा सांभाळली होती.
माणुसकीच्या उजेडातच हाती घ्यावेत हात आपुलकीचा स्पर्श हीच असते एक मात्र जात.
संकटाशीसुद्धा शब्द बोलावे चार दुःखांनाही घालावे चंदनाचे हार.
जेव्हा जेव्हा दारी येतील तिमिराचे झोत डोळ्यात असू द्यावी मांगल्याची ज्योत.
पश्चिमेच्या गाभाऱ्यात सामसूम होता अस्मिता सह ज्योत पेटवू उजळ राहील माथा…
अस्मिता संचालित म. ह. चोगले अस्मिता केंद्र बोरिवलीच्या क्राफ्ट विभागाच्या प्रशिक्षिका, केंद्र प्रमुख, काही विद्यार्थी व सहायकाने हस्तकला कार्यशाळेच्या निमित्ताने अमेय पालक संघटनेच्या खोणीगांव डोंबिवली येथील घरकुल या संस्थेला भेट दिली.
घरकुल हे मतिमंदांना सन्मानाने, प्रेमाने सांभाळणारं कायमस्वरुपी वसतीगृह आहे. येथील संचालकांना अस्मिता केंद्रात तयार होणारी फुलं खूप आवडली. त्यांच्या मुलांनाही अशा स्वरुपाची फुलं शिकवावी अशी त्यांनी संस्थेकडे विनंती केली. अर्थाजनाच्या दृष्टीने नव्हे तर कला निर्मीतीतून मतिमंद मुलांचं मन रमावं, वेळ जावा हा या कार्यशाळेमागचा उद्देश होता. अस्मितातील विद्यार्थ्यांना देखील प्रसंगी इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव मिळावा, त्याचसोबत एक चांगल्या हेतूनं काम करणारी संस्था प्रत्यक्ष बघता यावी म्हणून अस्मिता संस्था आणि घरकुल या दोन्ही संस्थांच्या संयुक्त संयोजनाने ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. घरकुलच्या विद्यार्थांना प्रशिक्षण देताना त्यांचा आनंद बघताना खूप समाधान लाभलं आणि सकारात्मक अनुभव सर्वांना मिळाला.
CSR उपक्रमांतर्गत सामाजकल्याण व सेवाभावी संस्थांना भेट देणे व तेथील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रतिष्ठित अधिकारी केंद्रात आले.केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले.संपूर्ण केंद्र ,फिजिओथेरपी विभाग, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व तेथील कामकाज त्यांनी खूप उत्साहाने बघितले व जाणून घेतले.संस्थेच्या संचालकांपासून ते कार्यकर्ते,सेवाव्रती आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मनापासून कौतुकही केलं.विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू व त्यांना प्रशिक्षण देणार्या प्रशिक्षकांची प्रशंसा केली.त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेतली.केंद्रातील कार्य बघून सर्व अधिकारी व कार्यकर्ते भारावून गेले.