+91-7208479918
info@asmitatrust.org

Balwadi Events

रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव

वसंत ऋतूच्या आगमनाने झाडे फुलांनी बहरलेली असतात. वसंत ऋतुचा आनंद आणि आशा यांचा हंगाम म्हणजेच होळीचा सण ! बाजारपेठा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगाच्या पिचकाऱ्यांनी नटलेल्या असतात. मुलांमध्ये हा आनंददायक उत्सव खूप लोकप्रिय होतो. होळी हा सण साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. होळीच्या विविध पैलुमुळे होळीचे वेगळे महत्त्व आहे. आपल्या मुलांना हे पैलू समजले पाहिजेत. होळीचे महत्त्व व माहिती झाली पाहिजे.

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्याचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्साहाचा,

आपल्या अस्मिता बालवाडीतील छोट्या बाळगोपाळ यांनी आज उत्साहाने व प्रेमाने साजरी केली. रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव. विविध रंगामध्ये मनसोक्त खेळत, एकमेकांना रंगवताना धमाल नृत्य करीत, बाळगोपाळांसह मोठ्यांना रंग खेळण्यास सामील करून घेत मुलांनी रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली.  

भातुकलीचा खेळ – बालपणीच्या आठवणी जपण्याचा एक प्रयत्न

“भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी….”
हे गाणं ऐकत जे लहानाचे मोठे झाले त्यांना भातुकलीचा खेळ म्हणजे काय हे नक्कीच माहीत असेल. अनेकांचे बालपण या खेळाने समृद्ध झालेले असेल. काहीजणींनी तर त्यांची जुनी भातुकली आजवर जपूनही ठेवली असेल. कारण हा नुसता एक बालपणीचा खेळ नसून स्वयंपाकघरात कसं वागायचं याचा नकळत बालमनावर झालेला संस्कारही होता. प्रत्येकाला आयुष्यात स्वतःचं घरकुल हवं असतं. भातुकलीच्या खेळातून लहानपणापासूनच मुलांना घर व्यवस्थापनाचे धडे मिळत असत. एवढंच नाही तर बालपणीचा काळ भुर्रकन उडून गेला तरी आणि भातुकलीच्या खेळातील गोड आठवणी आयुष्यभर त्यांच्या मनात कायम राहत असत. मात्र आजकाल व्हिडिओ गेम्सच्या युगात लहान मुलं या खेळापासून काहीशी दुरावली आहेत. अशा वेळी मुलांना काही मैदानी अथवा शारीरिक हालचाल करणारे खेळ खेळण्याची गरज असते. काळाच्या ओघात विस्मरणात गेल्यामुळे आजकालच्या लहानपिढीला भातुकली या घरात खेळता येणाऱ्या सोप्या खेळाबद्दल फारसं काही माहीत नाही.

यासाठीच शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर, बालवाडी विभागाने पालकांच्या सहकार्याने माती, बीड , लाकूड, तांबं , पितळ, ॲल्युमिनिअम, स्टील, काच, मार्बल अशा अनेक प्रकारच्या धातूंचा आणि इतर साहित्याचा वापर करून भातुकलीची मांडणी केली होती. जेणेकरून आपल्या मुलांना महाराष्ट्राची संस्कृती जपणारी एक पारंपरिक भातुकलीची माहिती व ओळख व्हावी.

कार्यक्रमाचे वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वैभवी कोरगावकर ,तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री संतोष फडतरे , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रचना पवार व पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भोसले मॅडम यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी आपल्या येथे कार्यरत असलेल्या समुपदेशन विभाग व त्यांची टीम यांनीही भरपूर सहकार्य केले.

तसेच शिक्षण प्रकल्प प्रमुख श्री. श्रीकांत खंडकर यांनीही सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून आपले विचार प्रकट केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर पारखी, विश्वस्त श्री. सुनील जाधव , श्री. वासुदेव साठ्ये , श्री. गौतम मुरकुंडे , श्री. अंकुश बेटकर तसेच प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पालकवर्ग या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व शिक्षकांचा आनंद द्विगुणित केला.

अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर बालवाडी विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलन

मराठी “अस्मितामधे” मिळाली सात्विक आनंदाची अनुभूती!

– सौ. सुप्रिया सचिन पिळगावकर

अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर बालवाडी विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा ३ फेब्रुवारी २०२४ रोजी छान पैकी पार पडला. ह्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया सचिन पिळगावकर आल्या होत्या. ज्यांचं स्वतःच शिक्षण ही मराठी माध्यमाच्या विद्यालयातून झालंय.

त्यांनी मुलांचं भरभरून कौतुक केलंच. शिवाय मराठमोळ्या अस्मिता शाळेचंही कौतुक केलं. अशी शाळा अजूनही आपलं मराठीपण टिकवून आहे ह्याचा त्यांनाही आनंद होता. त्यांचे अनेक अनुभव सांगितले . मराठी शाळा टिकल्या पाहिजे ह्याचही महत्व सांगितलं.

कार्यक्रमासाठी लाभलेल्या दुसऱ्या अतिथी होत्या पूर्णिमा सदाशिव पारखी. ज्यांचंही मराठी माध्यमातून शिक्षण. UDCT या माटुंगा येथील विद्यापीठातून MSc Physics आणि IIM कलकत्ता मधून International Business सर्टिफिकेट. ३० वर्षांचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सेल्स , मार्केटींग वगैरे विविध कामाच्या स्वरूपाचा अनुभव.

मराठी , इंग्रजी या भाषांमधून लेख प्रसिद्ध आहेत.

बालवाडी शिक्षकांनी आणि पालकांनी मिळून अखंड भारत ही संकल्पना ठेवून मुलांकडून सुंदर सादरीकरण करवून घेतले. ज्यात प्रत्येक मुलाचा सहभाग होता. मुलांसोबतच पालक, शिक्षक ह्यांचेही सुरेख सादरीकरण होते.

चांगला नागरिक घडण्यासाठी चांगल्या संस्कारांची गरज आहे आणि हे संस्कार मिळण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण गरजेचं आहे.

गुरुवार, दिनांक १८ जानेवारी २०२४ – मंदिर क्षेत्र भेट

रामेश्वर मंदिर व सद्भक्ति मंदिर (दत्त मंदिर)

छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर विभागातील बालवाडीच्या मुलांना सरस्वती बाग, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथील रामेश्वर मंदिर व सद् भक्ति मंदिर येथे क्षेत्रभेटीसाठी नेण्यात आले. बालवर्ग व शिशुवर्ग यातील एकूण ९० मुले उपस्थित होती. सर्वप्रथम रामेश्वर मंदिरात महादेव शंकराचे भजन म्हटले. देवी शारदेची प्रार्थना म्हटली. श्रीराम, माता सिता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा केलेल्या मुलांचे गीतातून व नृत्यातून स्वागत करण्यात आले. रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र, महामंत्र हा नव विजयाचा हे गीत म्हटले. घोषणा दिल्या. नंतर सद् भक्ति मंदिरात श्री दत्तगुरु यांचे भजन म्हटले. हे देवबाप्पा आम्हा सर्वांना सदबुद्धी दे अशी प्रार्थना करण्यात आली. महादेव शंकराचे, अक्षता कलश व दत्तगुरू यांचे दर्शन सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी घेतले. मुलांना दोन्ही मंदिराची माहिती दिली. त्यांना केळी, द्राक्ष, बिस्किट पुडा, मनुका याचा प्रसाद देण्यात आला.

वरील क्षेत्रभेट ही संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पारखी सर, उपाध्यक्ष मा. श्री. रवी नत्थाणी सर , कोषाध्यक्ष मा. श्री. गौतम सर, संस्थेचे इंटरनल ऑडिटर मा. श्री. विवेक ताम्हाणे सर तसेच नगरसेवक मा. श्री. पंकज यादव यांच्या उपस्थितीत खूप चांगल्या पध्दतीने, सुव्यवस्थितीत व सुरक्षित पार पडली. श्री रामेश्वर मंदिर व सद् भक्ति मंदिर या दोन्ही मंदिरातील सर्व विश्वस्त व सदस्य यांनी आम्हा सर्वाना मोलाचे सहकार्य केले.

शनिवार, दिनांक १३ जानेवारी २०२४  – श्लोक पठण स्पर्धा

‘‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत सदा नवी दिशा असावी.
घरट्याचे काय बांधता येईल केंव्हाही,
पण क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी’’

मनाचे श्‍लोक व रामरक्षा घराघरापर्यंत पोहचवत पुढील पिढी घडण्यास मदत व्हावी, तसेच त्यांचे मनोधैर्य व मनोबल, स्मरणशक्ती वाढविणे, वाणी स्पष्ट होणे, वक्तृत्व सुधारणे, आपल्या संस्कृतीची माहिती होणे, हा या श्लोक पठण स्पर्धेचा उद्देश आहे.

बालवाडी विभागात   १) शिशुवर्ग (३.५० ते ४.५० वर्षे वयोगट ) =   मनाचे १० श्लोक

                               २) बालवर्ग (४. ५० ते ५. ५० वर्षे वयोगट ) =  रामरक्षा स्तोत्र

वरील प्रमाणे श्लोक पठण स्पर्धा घेतली. एकूण ३५ मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परिक्षक म्हणून मालाड येथील संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान संस्थेचे कार्यकर्ते व पुरोहित मा. श्री. गजानन जोशी उपस्थित होते.

तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पारखी सर, कार्याध्यक्षा मा. श्रीमती मेधा ताई, कार्यवाह मा. श्री. चाचड सर, संस्थेचे सदस्य मा. श्रीमती सुधा ताई, मा. श्री. म्हात्रे सर, तसेच संस्थेचे कर्मचारी श्री. नितीन जोग सर, श्री. संतोष पालव सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. फडतरे सर, प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

प्रथम राष्ट्रगीत, राज्यगीत, शारदेची प्रार्थना घेतली. पाहुण्यांचा परिचय व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.  स्पर्धेला सुरुवात झाली. दोन्ही स्पर्धेत उत्साहाने मुलांनी सहभाग घेतला.  

यश संपादन केलेल्या मुलांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले. सहभाग घेतलेल्या मुलांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. मुलांना बिस्किटे व खजूर हा खाऊ दिला. अशा प्रकारे श्लोक पठण स्पर्धा खूप उत्साहात आनंदात पार पडली.

गणपती बाप्पाची चित्रशाळा…एक भेट गणेश चित्र शाळेची

गणपती बाप्पाची चित्रशाळा…एक भेट गणेश चित्र शाळेची 18.07.23

अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर या बालवाडी विभागातील बाल गोपाळ यांनी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर पारखी सर यांच्या मार्गदर्शनातून गणपती बाप्पाच्या शाळेला भेट दिली.

प्रत्यक्षात शाडूच्या मातीपासून गणपती बाप्पा कसे तयार करतात. शाडू मातीमध्ये पाणी किती प्रमाणात मिसळावे, आकार देताना माती किती मिळून घ्यावी यासह हात, पाय, कान यांचे विविध आकार कशाप्रकारे तयार करावेत हे तेथील आयोजकांनी प्रात्यक्षिकासह शिकवले. त्यांचे रंगकाम कसे करतात. आयोजकांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती निर्मितीचा आनंद अनुभवला.

आषाढी एकादशीनिमित्त छोट्या वारकऱ्यांची दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त छोट्या वारकऱ्यांची दिंडी. 01.07.2023

टाळ मृदुंगाच्या गजरात छोट्या वारकऱ्यांची दिंडी. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर, रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय व जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय (जोगेश्वरी पूर्व ) या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली.

शाळेतील बाळ गोपाळ यांची दिंडी, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात छोट्या विद्यार्थ्यांनी दिंडीचे आयोजन करून शाळेत विठ्ठलमय वातावरण निर्माण केले. छोट्या बाळ गोपाळांचा रिंगण सोहळा व फुगडी विशेष आकर्षण ठरले. राम गोपाल केडिया प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांच्या रूपात अवघा संतांचा मेळावा उतरला होता. जणू काही विठ्ठल नामाची शाळा भरली. खांद्यावर दिंडी आणि दिंडीच्या पुढे विठ्ठल रुक्मिणी व मागे संत मंडळी आणि हातात सामाजिक व पर्यावरणाचे संदेश घेतलेले बाल वारकरी असा दिंडीचा नयनरम्य सोहळा शाळेमध्ये पार पडला. शाळेत विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लेझीम व ध्वजपथकांनी दिंडीचे स्वागत केले. राज्यभर झाडे लावून हिरवे रान फुलवण्याची मोहीम सुरू आहे. या निमित्ताने पर्यावरणाचे जतन व संरक्षण करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

तसेच अस्मिता संचालित जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय यांनी आषाढी एकादशीनिमित्त सकाळी सात ते आठ या वेळेत भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांनी अभंग व गजर अप्रतिम सादर केले. भक्ती संगीताचा आनंद घेत विठूरायाचा गजर म्हणण्यात शाळेचे वारकरी तल्लीन झाले. संस्थेचे विश्वस्त, तिन्ही विभागाचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला.

मेट्रो फील्ड ट्रीप

क्षेत्रभेट’ हा शालेय अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाचा घटक आहे. खासकरून विज्ञान, इतिहास व भूगोल या विषयांसंबंधी एखाद्या ठिकाणी नेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी विविध क्षेत्रभेटीचं आयोजन केलं जातं. उदाहरणार्थ साखर कारखाना, एखादं प्रसिद्ध उद्यान, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, एखादं निसर्गानं समृद्ध असणारं ठिकाण, भाजी मंडई आदी ठिकाणी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जातात व तेथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देतात.

प्रत्यक्ष अनुभवातून दिलं जाणारं शिक्षण हे चिरकाल स्मरणात राहतं, शाळेतील सृजनशील शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अशा फिल्ड ट्रिपचा अनोखा अनुभव देऊन त्यांचं ज्ञान व अनुभव समृद्ध करतात.

अस्मिता संचालित, छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर या बालवाडी विभागातर्फे ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बालवर्ग व शिशुवर्ग या बालगोपाळ यांची फिल्ड ट्रीप मेट्रोमधून नेण्यात आली होती. एकूण ११० मुलांनी जोगेश्वरी मेट्रो स्टेशन ते ओवरी पाडा असा मेट्रो मधून प्रवास केला. मुलांसोबत ११ शिक्षक होते. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर पारखी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मेट्रो सहल सुव्यवस्थित पार पडली. संस्थेचे कर्मचारी व मेट्रो कर्मचारी यांनी खूप लाख मोलाची मदत केली.

राम खिचडी अहवाल

राम खिचडी अहवाल १४.१२.२०२३

एक मूठ धान्य गरजूंसाठी… “प्रेरणा’दायी उपक्रम

भारतीय संस्कृतीत सहकार्य, सदभावना आणि अन्नदान अनन्यसाधारण महत्व आहे. अस्मिता संचालित, छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर या बालवाडीतील प्रत्येक मुलांनी एक मूठ धान्य आणले होते. उदा. (तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ)

गुरुवार, दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी जमवलेल्या एक मूठ धान्यापासून संघटीत राम खिचडी बनविण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पारखी सर यांनी पुढाकार घेऊन आजची राम खिचडी स्वत: बनवली. ही खिचडी बनवण्यासाठी बालवाडीतील प्रत्येक शिक्षक,विद्यार्थी तसेच प्राथमिक विभागातील श्री. दत्तात्रय पाटील सहभागी झाले होते. सर्वजण खूप तन्मयतेने व संघभावनेने सहभागी झाले होते. माध्यमिक च्या सर्व शिक्षकांनी मुलांना खिचडी वाढण्याचा आनंद घेतला. या उपक्रमात प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पण सहभागी झाले होते. खूप छान सर !

स्वादिष्ट राम खिचडीचा छोट्या चार वर्षाच्या मुलांपासून ते अस्मिता परिवारातील प्राथमिक, माध्यमिक, समुपदेशन विभाग, संस्था कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच सर्व पालकांनी सुद्धा या सर्वांनी खिचडी खाताना मनसोक्त आनंद घेतला. यासाठी आपले मनापासून खूप खूप आभार.

या उपक्रमातून संघभावनेपेक्षा कोणतीच भावना मोठी नाही हा मोलाचा संदेश प्रत्येकाला मिळाला आहे.

मातृदिन

मातृदिन १४.०९.२०२३

प्रेम तुझे आहे आई, सर्व जगतात भारी

अस्मिता संचालित

  • छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर जोगेश्वरी
  • राम गोपाल केडिया प्राथमिक विद्यालय
  • जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय

आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणे या हेतूने काल दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी मातृदिन साजरा करण्यात आला. देशात पिठोरी अमावस्येला मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मुलं आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देतात.स्वत:चा विचार करण्याआधी आधी आपल्या मुलांचा विचार करते ती म्हणजे आई. सर्व मुलांनी दूध, पाणी, गंध, फुल, अक्षता यांनी आईचे पाद्य पूजन केले. औक्षण करून भेट कार्ड व गुलाबाचे फूल दिले. आईसाठी मुलांनी गाणी म्हटली, कविता सादर केली. छान मनोगत व्यक्त केले. तसेच आई व मुलगी यांनी छान गाण्यावर नृत्य सादर केले.

मान. अध्यक्ष श्री. चंद्रशेखर पारखी यांनी सर्व पालकांशी हितगुज केले. सर्व शिक्षकांनी वर्गात मातृदिनाचे महत्व सांगितले. खूपच भाऊक व सुंदर असा मातृदिनाचा कार्यक्रम बालवाडीत साजरा झाला.

वार्षिक क्रीडामहोत्सव २०२३

अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर आयोजित वार्षिक क्रीडामहोत्सव जल्लोषात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर पारखी सर हे क्रीडामहोत्सवाच्या अध्यक्षस्थानी होते.

गुरुवार, दिनांक ०४.०१.२०२४ या दिवशी संस्थेचे सदस्य मा. श्री. रमेश म्हात्रे सर उपस्थित होते. तसेच बालवाडी विभागाच्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती उर्मिला कांबळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले. माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका मा. सौ. विजया गोळे सुद्धा उपस्थित होत्या.

शुक्रवार, दिनांक ०५.०१.२०२४ या दिवशी राष्ट्र सेविका समितीच्या कार्यवाहिका व सेविका श्रीमती कांचन पंडित व श्रीमती सिमा गोगटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी तेजश्री भाटकर ही सुद्धा पूर्ण वेळ उपस्थित होती.

बालमंदिरातील सर्व विद्यार्थ्यांनी या क्रीडामहोत्सवात भाग घेतला. सकाळी ९.०० वाजता क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली.

  • मोठा शिशु – अडथळा शर्यत , तीन पायांची शर्यत,
  • छोटा शिशु – बेडूक उडी, गोणपाट उडी शर्यत,
  • सांघिक खेळ – रस्सीखेच

यांसारख्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

सुरुवातीला मशाल प्रज्वलीत करून मुलांनी मैदानाला एक फेरी मारली तर काही मुलांनी छान स्वागत नृत्य करून पाहुण्यांचे जल्लोषात व उत्साहात स्वागत केले व त्या नंतर सर्व स्पर्धाना सुरुवात झाली. या वर्षी स्पर्धेसाठी दोन्ही दिवस प्राथमिक विभागाचे श्री. दत्ता पाटील यांनी खेळांचे उत्तम समालोचन करून मुलांचे छान मनोरंजन केले. तसेच समुपदेशन विभागाच्या सर्व शिक्षिका व माध्यमिक विभागाचे शिक्षक यांनी सुद्धा क्रीडामहोत्सवाला भेट दिली.

पालकांसाठी लंगडी तर शिक्षकांसाठी बादलीत चेंडू टाकणे ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धा संपल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करून विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे पदक व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. यावर्षी मुलांना उत्कृष्ट प्रकारची गोल्डन, सिल्व्हर, ब्रॉझ पदके उपलब्ध करून दिली. शेवटी सर्व मुलांना प्रत्येकी २/२ रुमाल, मावा केक व फ्रूटी यांचे वाटप करून क्रीडामहोत्सवाची सांगता केली.


डिसेंबर – जानेवारी म्हणजे थंडीचा महिना. शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी, शारीरिक व्यायाम, थोडी कसरत खूप आवश्यक. ह्याचं काळात मुलांचे क्रीडा महोत्सव अस्मितामध्ये आयोजित केले जातात. ह्यावर्षी अस्मिता बालवाडी आणि शिशु विभागाच्या क्रीडा महोत्सवाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं म्हणून हा छोट्या दोस्तांचा छोटासा विडिओ. बालपणीचे आमचे दिवस आठवले.

असं म्हणतात लहान मुलांसोबतचे थोडेसे क्षण मनाला खूप मोठा आनंद देऊन जातात. तसंच काहीसं झालं. रोजच्याच दिवसातून दोन तास ह्या लहान मुलांसोबत घालवले पण खूप आनंद आणि समाधान देऊन गेले.

रक्षाबंधन

रक्षाबंधन… सण हर्षाचा, उत्साहाचा, आपलेपणाचा….

अस्मिता संचालित छत्रपती शिवाजी शिशु विकास मंदिर या विभागामध्ये आज आपल्या चिमुकल्यांनी दरवर्षीप्रमाणे दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक मानला जातो.

अस्मिता तर्फे राख्या, तिरंगी गुलाब , शुभेच्छा संदेश व कृतज्ञता पत्र सीमेवरील सैनिकांना देण्यात आले. अस्मिता संचालित म.ह.चोगले अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्रातील हस्तकला विभाग प्रमुख सौ.मंजिरी काळे व त्यांचे कुटुंबियांनी ईशा टूर्स द्वारे लडाख येथे आयोजित रक्षाबंधन विशेष सहली दरम्यान भारतीय लष्करातील सैनिकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

जोगेश्वरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री.इरफान शेख, श्री.जामदार, श्री.वेंगुर्लेकर,तसेच कावळे मॅडम, आयेशा मुल्ला आदींना गट प्रमुख आणि शिक्षक ,मुख्याध्यापक यांनी राखी बांधली.

मुलींनी मुलांचे औक्षण केले, मिठाई भरवली व त्यांना राखी बांधली. सर्व मुले आज छान रंगीबेरंगी कपडे घालून आली होती, डब्यात गोड शेवबुंदी आणली होती. येथील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने राख्या बांधल्या. रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांनी मुलांकडून रंगीत पेपर, मणी, टिकल्या या अनेक वस्तूंपासून सुंदर अशी राखी तयार केली.

संस्थेतर्फे पालकांनाही राखी कार्ड भेट म्हणून दिले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पारखी, तसेच संस्थेचे विश्वस्त मा.श्री. वासुदेव साठ्ये यांनी बालवाडीत भेट दिली.