“वंदे मातरम्” या गीताच्या 150 व्या वर्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेने “वंदे मातरम् ” या गीताचे सामूहिक गायन व या गीताचे महत्व या बिंदूंवर समाजाशी संवाद साधण्यासाठी शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी अस्मिता भवन मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्वदेशी जागरण मंच अ. भा. कार्यकारणी सदस्य श्री. प्रशांत देशपांडे यांनी भारतीय लढ्यात या गीताची भूमिका, स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणा, राष्ट्रीय प्रतिकारकत्मकता आजही हे गीत कसे प्रासंगिक आहे, या मंत्राचे सामर्थ्य या विविध मुद्द्यांना स्पर्श केला. तसेच ” पंच परिवर्तन ” या सामाजिक उपक्रमाविषयी महत्व विशद करताना समाजातील जाती व्यवस्था, कुटुंबातील संस्कारी वातावरण, पर्यावरण जागृती, नागरी शिष्टाचार,’स्व’ चा भाव या बिंदूंचा उहापोह केला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या मूलभूत मूल्यांची पुनर्स्थापना करून नव्या पिढीला जबाबदार नागरिक बनवणे आणि समाजातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपला देश विकसित, संघटित,सुरक्षित आणि आत्मगौरवाने परिपूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचा समारोप संपूर्ण वंदे मातरम् गीत गायनाने झाला.

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त वैचारिक प्रबोधन करणारे प्रेरणादायी व्याख्यान
अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था आयोजित राष्ट्रीय युवक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत व विधिज्ञ ॲड. किशोरजी जावळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. शेखरजी पारखी यांनी प्रमुख वक्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संघरचनेतील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळलेल्या ॲड. जावळे यांच्या अनुभवसंपन्न विचारांना उपस्थितांनी मनापासून दाद दिली.
विनायक पेडणेकर यांनी “विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक कसा असावा” याचे प्रभावी वाचन सादर केले. त्यानंतर समीर नागवेकर यांनी “नटवू निज कर्तुत्वाने” हे भावस्पर्शी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
ॲड. किशोरजी जावळे यांनी श्रीकृष्णाने एकट्या अर्जुनाला गीता का सांगितली, या उदाहरणातून उपस्थितांचे स्वागत करत “प्रेरणादायी व्यक्तींना भावनेच्या चौकटीत अडकवू नका” असा महत्त्वाचा संदेश दिला.
स्वामी विवेकानंद हे केवळ संन्यासी नसून “योद्धा संन्यासी” का म्हटले जातात, याचे सखोल विवेचन त्यांनी केले.
जिजीविशा व विजीविशा या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करत हिंदू धर्माची बैठक ही वेदांत विचारांवर आधारित असल्याचे सांगितले.
कौरव–पांडवांच्या उदाहरणातून “आपापसात भांडू नका, बाहेरून कोणी आले तर आम्ही १०५ आहोत” असा एकतेचा संदेश दिला.

पंचमहावाक्यांचा अर्थ स्पष्ट करत “फळाची चिंता न करता कर्म करा”, “आजन्म कर्म करणाऱ्यालाच खरा संन्यासी म्हणावे”, तसेच गीतेचे प्रयोजन काय आहे हे सोप्या भाषेत उलगडले.
काम करता करता देवाचे रूप पाहा, कुटुंबातील आपले स्थान ओळखा, योगक्षेम टाळू नका व घरच्या भाकरीकडे लक्ष द्या, असे जीवनोपयोगी विचार त्यांनी मांडले.
संत परंपरा, समाज आणि सनातन संस्कृती महाराष्ट्रातील वारकरी व धारकरी संत परंपरा, त्यांचे सामाजिक योगदान, तसेच रामदास स्वामींना दासबोध का लिहावा लागला, याविषयी त्यांनी ऐतिहासिक संदर्भांसह माहिती दिली.
इ.स. १६३४ मधील बाबा हरगोविंद व रामदास स्वामी यांचा संवाद याचे उल्लेख विशेष ठरले. मनातील माया काढून संसार करा, समाजाला कोणत्या प्रकारच्या संन्यासाची गरज आहे या विधानावर मार्मिक उदाहरणे देत श्रोत्यांना अंतर्मुख केले.
धर्म, धैर्य आणि वास्तव,धर्मगुरू व राजगुरू यातील फरक स्पष्ट करत,
६ डिसेंबर १९९२ च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर “हिंदूंना भीती वाटण्याची गरज आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला.
“कस दिलपणा सोडा, दुर्बलांचा सखा कोणी होत नाही” हे सांगताना वारा, वनवा, कोंबडी, बकरा व वाघ यांची गोष्ट प्रभावीपणे मांडली.

हिंदुत्व म्हणजे केवळ भाषा, आहार किंवा सण नव्हे, तसेच शंकराचार्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराचा प्रसंग याचे तत्त्वज्ञानात्मक विवेचन केले.
युवकांना प्रेरणादायी आवाहन करताना“सगळी वेळ सारखी नसते, परिस्थितीनुसार नियम व मूल्ये बदलावीत”, त्यासाठी स्वागतशील रहा. आणि खऱ्या “सनातन संस्कृतीचा महोत्सव साजरा करा”,
“युवकांनो उठा, झेप घ्या, दिशा तुम्हालाच शोधाव्या लागतील” हे प्रेरणादायी वाक्य उपस्थितांच्या मनात ठसले.
“खोट्या प्रतिष्ठेपेक्षा सत्याची बाजू घेण्याची हिंमत आपल्यात आहे का?” हा विचारप्रवर्तक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. श्रीकांत खंडकर, संस्थांचे हितचिंतक, पालक, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण व्याख्यानातून राष्ट्रीय युवक दिनानिमित्त वैचारिक बळ, आत्मविश्वास व कर्मनिष्ठेचा संदेश देण्यात आला. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.