+91-7208479918
info@asmitatrust.org

Primary School Events

दिवाळी निमित्त आकाश कंदील

मी मतदान करणार,तुम्ही सुद्धा करा. * मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो * चुनाव का पर्व, देश का गर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 मतदान जागृती करणे यासाठी अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय,इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची भेट कार्ड तयार करणे व आकाश कंदील बनवणे स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मतदान करणे आपला सर्वांचा हक्क आहे तसेच लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी विविध प्रकारच्या घोषणा विद्यार्थ्यांनी आपल्या भेट कार्ड व आकाश कंदील यांच्यावर लिहिल्या होत्या.

रामायण, महाभारतातील गोष्टी.कथाकथन स्पर्धा

शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी आपल्या अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालयामध्ये एच पूर्व , एच पश्चिम, के पूर्व , के पश्चिम विभाग अंतर्गत खाजगी प्राथमिक शाळा यांची कथाकथन स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत विभागातील 18 शाळांनी सहभाग नोंदविला होता.

इयत्ता तिसरी साठी रामायणातील गोष्टी तर, इयत्ता चौथीसाठी महाभारतातील गोष्टी या विषयावर विद्यार्थ्यांनी कथाकथन केले.

गणपती बाप्पा कार्यशाळा

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ l
निर्विघ्नम् कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा

प्राथमिक विभागातील इयत्ता चौथीच्या ११० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक गणराय साकारले. शाळेच्या शिक्षिका श्रीमती संगीता शंकर सातपुते यांनी विद्यार्थ्यांना प्रथम प्रात्यक्षिक दाखवून नंतर सूचनेनुसार कृती करण्यास सांगितल्या. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सौ. ज्योत्सना शेलार यांनी सहाय्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या स्नायू कौशल्यांचा विकास व स्वनिर्मितीचा आनंद मिळाला. शाडूच्या मातीचे गणपती बनवून पर्यावरणपूरक संस्कृती जपण्याचा संदेश दिला. मूर्ती सुकल्यानंतर त्यांना रंगकाम केले.

दीप अमावास्या

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

आपल्या संस्कृrतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. आपल्या घरातील इडापिडा टाळून,अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.

अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विभाग दिनांक: ३ऑगस्ट २०२४ रोजी दीप अमावास्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाने करण्यात आली. नियमित परिपाठ झाल्यानंतर इयत्ता चौथीतील कु.आदित्य कारके या विद्यार्थ्याने दीप अमावस्येची माहिती सांगितली. नंतर चौथीतील विद्यार्थिनींनी ‘आधी होते मी दिवटी’ ही कविता व ‘शुभम कुरुत्वंम् कल्याणम्’ हा श्लोक तालासुरात म्हटला.

इयत्ता पहिली ते चौथीच्या प्रत्येक वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी रंगीत कणकेचे गोळे आणलेले होते त्यापासून विद्यार्थ्यांनी स्वकल्पतेने दिवे बनवून ते सजवले.इयत्ता पहिली ते चौथीच्या प्रत्येक वर्गात वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांची मांडणी करून व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या दिव्यांची आरास करून ते प्रज्वलित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनवलेले दिवे स्वतः प्रज्वलित करण्यात त्यांना खूप आनंद वाटत होता.

गुरुपौर्णिमा

रविवारी असणारा गुरुपौर्णिमा दिवस दिनांक २० जुलै, २०२४ रोजी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात व्यास ऋषींच्या प्रतिमेला सर्व विद्यार्थ्यांनी वंदन करुन झाली. या कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष सन्माननीय श्री. गौतम मुरकुंडे , कौशल्य विकास विभागाचे प्रमुख सन्माननीय श्री. प्रफुल्ल शिंगणापूरकर, शाळेच्या भौतिक सुविधा पाहणारे सन्माननीय श्री. नितीन जोग सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करुन त्यांना शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

श्रीम. संगीता सातपुते यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व व गुरु शिष्याची गोष्ट सांगून सुरुवात केली. मुलांमध्ये सभाधीटपणा, नेतृत्व, वक्तृत्व व त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रमाचे फलक लेखनापासून ते निवेदना पर्यंत सादरीकरण विद्यार्थ्यांनीच केले. गुरु शिष्यांचे महत्त्व कथन व गुरु गीताचे गायन विद्यार्थ्यांनी केले. वाल्मीकी ऋषी व नारदमुनी , एकलव्य व द्रोणाचार्य या गोष्टींची नाटुकली उत्कृष्टपणे सादर केली. गुरूंविषयी आदर , त्यांचा महिमा नृत्यातून विद्यार्थ्यांनी सादर केला. पौराणिक आधुनिक गुरु-शिष्यांच्या जोड्यांचे सादरीकरण करण्यात आले.