+91-7208479918
info@asmitatrust.org

अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय जोगेश्वरी पूर्व

१ मे १९७६ ला अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली ती मुळी ‘समोर तारा एकच आणि पायतळी अंगार ‘ या उक्तीला समोर ठेवूनच. जोगेश्वरी सारख्या अत्यंत गरीब, कोणत्याही सुविधा नसलेल्या विभागाची खऱ्या अर्थाने अस्मिता जागृत करण्याचे कार्य गेले पंचेचाळीस वर्ष अविरतपणे अस्मिता संस्था करीत आहे. फक्त शिक्षण देणे हा अस्मिताचा उद्देश नसून संस्कारक्षम व सुजाण भावी नागरिक घडविणे. यासाठी अस्मितेची शैक्षणिक चळवळ सुरू झाली .

१ जून १९७७ ला किमान १० मुलाना घेवून अस्मिताचे बालमंदिर समर्थ नगर व बांद्रेकरवाडी येथे सुरू झाले. १ जून १९७८ ला इयत्ता १ ली चा वर्ग सुरू झाला. चाळीतील छोट्या जागेत इयत्ता १ ली चा वर्ग सुटला की बालवाडी त्याजागेतच भरत असे तसेच शिशुवर्ग ते इयत्ता दुसरीचे वर्ग – कधी पाटणकर मॅडम कधी श्री. पारकर कधी, समर्थ नगर तर कधी गणेश हॉटेल येथील छोट्याशा जागेत भरत असत. शाळेला स्वतःची वास्तु असावी असा निर्णय सर्व विश्वस्तानी घेतला. आताची अस्मिताची जुनी वास्तु आहे तिथे पूर्वी छोटे मैदान होते त्या जागेवर शाळा उभी करण्यासाठी तेथील रहिवाशी व सरकारी परवानगी घेण्यात आली. नि:स्वार्थ विचार, प्रामाणिकपणा,जिद्द व चिकाटी च्या जोरावर पाडव्याच्या मुहूर्तावर डॉक्टर मा. भि.नत्थाणी यांनी  भूमिपूजन केले . सर्व विश्वस्त शिक्षक व पालक यांच्या देणगी रूपातून १४ जुलै १९८० ला संस्थेची नवीन इमारत तयार झाली. प्राथमिक विभागाला मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. १९८१ ला शाळेला मान्यता मिळाली. ‘अस्मिता प्राथमिक विद्यालय ‘ या नावाने प्राथमिकचे वर्ग सुरू झाले. १९८१ ला श्री. विमलजी केडिया यांनी ५१००० हजार रु. शाळेला देणगी दिली त्यामुळे प्राथमिक विभागास त्यांच्या वडिलांचे नाव देण्यात आले – ‘राम गोपाल केडिया प्राथमिक विद्यालय’.

अशाप्रकारे प्राथमिक विभागाची वाटचाल सुरू झाली भविष्याचा विचार करून १९९४ पासूनच इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यासाठी इंग्लिश संभाषण वर्ग सुरू करण्यात आले व त्यानंतर साधारण २००० पासून शाळेच्या नवीन इमारतीत प्रवेश केल्यावर प्राथमिक विभागातील १ ली ते ४ थी च्या वर्गाना संगणक विषय सुरु झाला.

शाळा हे एक पवित्र मंदिर आहे त्यामुळे पायरीला वंदन करूनच शाळेत प्रवेश करावा याची प्रेरणा विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळते. पाश्चिमात्य पद्धतीने केक कापून मेणबत्या विझवून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा शाळेत प्रत्येक मुलाचे वाढदिवस औक्षण करून साजरा करण्याचे महत्त्व पालकाना व मुलाना पटवून दिले जाते. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे आयुष्य घडविणारे शिक्षण मिळावे त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी लहानपणापासूनच अल्पबचतीची सवय लागावी म्हणून ‘धनश्री ‘ बचत योजना सुरू केली आहे.

अध्ययन करताना तसेच शिस्त लागावी यासाठी ‘नि:शब्द’ दिन पाळला जातो. भारतीय संस्कृती व मुल्यसंवर्धन व्हावे यासाठी सर्व सण व उत्सव शाळेत साजरे केले जातात . योगदिन, गुरुपौर्णिमा, आषाढीएकादशी , मातृदिन , रक्षाबंधन, गोपाळकाला, नागपंचमी, कन्यादिन विद्यार्थीदिन, संविधानदिन, पाटीपूजन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन , स्वच्छता मास, तिळगूळ समारंभ , इंग्लिश डे इत्यादि सर्वांचे महत्त्व विषद करून त्या संबंधीचे उपक्रम  सादर केले जातात पालकांसाठी कार्यशिबिरे घेवून त्यात त्यांना त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन वर्ग व त्या संदर्भात तपासण्या केल्या जातात.

विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी वर्षातून एकदा केली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगी संघभावना, खिलाडू वृत्ती व व्यायामाचे महत्त्व यावे म्हणून खेळाचे तास होतात रोपस्किपिंग, कराटे, आर्चरी यांचे ही वर्ग आहेत पालक संपर्क वाढवा व त्यातून शाळेचा पट वाढवा म्हणून वस्त्यावस्त्यातून हळदीकुंकू समारंभ घेण्यात येत असत.

इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेत शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत असत तसेच महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेतही इयत्ता २ री ते ४ थी चे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत असत . २००० साली शाळेला शैक्षणिक साहित्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला, रंगशारदा चित्रकला स्पर्धा, सकाळ कात्रण स्पर्धा लोकमत स्पर्धा यात देखील शाळेच्या विद्यार्थ्यानी प्राविण्य मिळविले आहे. २०१९ साली जोगेश्वरी मॅरेथॉन स्पर्धेत १० बक्षिसे मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.

शाळा अध्ययन क्षेत्र तसेच सहशालेय उपक्रमात यश मिळवीत असतानाच शाळेच्या सर्व कामात सुसूत्रता यावी व शाळेचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावाजले जावे यासाठी अथक परिश्रमाने शाळेने २००१ साली ISO मानांकन मिळविले तसेच २०१२ साली राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळविले.

 विद्यार्थी सर्वांगाने घडला पाहिजे. पुस्तकी ज्ञानाबरोबर इतरही ज्ञान देणे आवश्यक आहे, अनुभवातून विद्यार्थी शिकला पाहिजे जिज्ञासा ,कुतूहल जागृत होऊन प्रयोगशील वृत्ती निर्माण व्हावी  यासाठी गणित प्रयोग शाळा, गायन व नृत्य कक्ष, अॅक्टिविटी रूम इत्यादि शाळेने विद्यार्थ्याना उपलब्ध केले आहेत.

ठळक वैशिष्टये

  • स्वच्छ व सुसज्ज वर्गरचना
  • कृतीशील अध्यापन प्रक्रिया
  • ज्ञानरचनावाद शिक्षण पध्दतीचा वापर
  • इयत्ता पहिलीपासून संगणक वर्ग,प्रत्येक विदयार्थ्याला एक संगणक उपलब्ध
  • स्वतंत्र इंग्रजी संभाषण वर्ग
  • विदयार्थ्यार्ंसाठी समुपदेश केंद्र
  • विदयार्थ्यार्ंसाठी क्रीडाशिबीर
  • विदयार्थ्यार्ंसाठी शालेय स्पर्धा व अभ्यासवर्ग
  • सुसज्ज ग्रंथालय
  • विदयार्थीी वैदयकीय तपासणी
  • सण -उत्सवांव्दारे संस्कृतीची जोपासना
  • धनश्री बचत योजना
  • विदयार्थ्यार्ंच्या शारीरिक विकासासाठी मल्लखांब,जिमनॅस्टिक,धनुर्विदया,कराटेवर्ग, रोप स्पिकिंग
  • सन २००५ मध्ये गुणवत्ता अभिमानांकन प्राप्त करणारी महाराष्ट्रातील एकमेव प्राथमिक मराठी शाळा
  • विदयार्थ्यासाठी शालेय बहिःशालेय विविध स्पर्धा
  • पालकांसाठी विविध स्पर्धा व अभ्यासवर्ग
  • सुसज्ज आधुनिक प्रयोग शाळा
  • इंग्रजी,शारीरिक शिक्षण व संगीत, संगणक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक संस्थेने नियुक्त केले आहेत